ताज्या घडामोडी

सहकार महर्षी गुलाबराव पाटील पुरस्काराचे वितरण जिल्हा बॅंकेने कृषीसाठी नावीन्यपूर्ण योजना राबवावी : आमदार जयंत पाटील


सहकार महर्षी गुलाबराव पाटील पुरस्काराचे वितरण
जिल्हा बॅंकेने कृषीसाठी नावीन्यपूर्ण योजना राबवावी : आमदार जयंत पाटील

सांगली प्रतिनिधी इरफान बारगीर- सांगली ः ‘‘सध्या नवनवीन तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. याचा वापर करून शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवा. शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करा. शेतकऱ्यांच्या प्रगतीने जिल्ह्याचे उत्पादन वाढेल,’’ असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी आज येथे केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्हा बँक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या सहकारतपस्वी गुलाबराव पाटील पुरस्काराचे वितरण आमदार श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक, संचालक अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, वैभव शिंदे, कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, की गत पाच वर्षांत बँकेची चांगली प्रगती झालेली आहे. बँकेत मनमानी व राजकारणाचा अड्डा करण्यापेक्षा नियोजनबद्ध काम झाल्यामुळे ठेवी आणि कर्जे यांच्यामध्ये वाढ झालेली आहे. बँक पदाधिकाऱ्यांनी उचापती न केल्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यात अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे योगदान उल्लेखनीय आहे. गत दहा वर्षांत सहकार चळवळ बदलत आहे. प्रत्येक व्यवसायाला पर्याय उपलब्ध होत आहेत. जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत, तेवढेच आता खासगी कारखाने तयार होत आहेत. मात्र नागरी बँका, सेवा सोसायटी या ठिकाणी ही चळवळ कायम राहील.’’
ते म्हणाले, की जत, आटपाडी परिसरात सिंचन योजनामुळे पाणी गेले आहे. बागायती क्षेत्र वाढत आहे. ए. आय. सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा याचा वापर करून नावीन्यपूर्ण योजना राबवा. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांना संरक्षण होईल. जिल्ह्याचे उत्पादन वाढेल. गुलाबराव पाटील यांच्यामुळे सहकार चळवळीला चालना मिळाली.’’
बॅंक अध्यक्ष नाईक म्हणाले की ‘‘गुलाबराव पाटील, बाळाजी पाटील यांनी बँकेत राजकारण न आणता काम केले. तोच वारसा कायम ठेवत गत साडेतीन वर्षांपासून बँकेचा कारभार सुरू आहे. वसंतदादा, राजारामबापू यांनी राज्य, देशपातळीवर नेतृत्व केले. मात्र बँकेत कधीही राजकारण आणले नाही. शेतकरीहिताची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांचे राजकारण वेगळ्या उंचीवर होते. विकासाची व अर्थकारणाची भूमिका होती. बँकेचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. तेव्हा, दहा हजार कोटी ठेवींचे, तर आठ हजार कोटी कर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोणतीही चूक केली नाही म्हणून खुल्या सभागृहात वार्षिक सभा घेतली.’’
बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील म्हणाले, की सहकार क्षेत्रात गुलाबराव पाटील यांचे उल्लेखनीय योगदान आहे. जिल्हा बँकेचा पाया भक्कम घातला. त्यामुळे आज राज्यातील टॉप पाच बँकांमध्ये या बँकेचा समावेश आहे.’’ संचालक वैभव शिंदे यांनी आभार मानले .
पुरस्कार विजेते…
आदर्श विकास सोसायटी पुरस्कार अनुक्रमे बावची, सावळवाडी, वसगडे सोसायटीस देण्यात आला. आदर्श विकास सोसायटी सचिव पुरस्कार समडोळी सोसायटीचे रसूल नदाफ, बावची सोसायटीचे विजय वाजे, वसगडे सोसायटीचे संतोष पाटील, तर आदर्श नागरिक सहकारी पतसंस्था पुरस्कार वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी बँकेला देण्यात आला.


Translate »
error: Content is protected !!