ब्रेकिंग न्यूज

महसूल विभागात मोठा भूकंप! उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित; राज्यभर चौकशीचे आदेश


महसूल विभागात मोठा भूकंप!
उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित; राज्यभर चौकशीचे आदेश

विशेष प्रतिनिधी :महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम १५५ चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे व जमिनींचे फेरफार केल्याप्रकरणी महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, केवळ निलंबनावर न थांबता संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. गंभीर प्रकरणांतील काही अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचाही इशारा त्यांनी दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महसूल अधिनियमातील कलम १५५ च्या गैरवापराकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पुणे विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने ही मोठी कारवाई केली आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, पुणे विभागातील धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता राज्यभर मागील पाच वर्षांत कलम १५५ अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व आदेशांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर केला जाणार आहे.
ते पुढे म्हणाले, “या प्रकरणामध्ये एका व्यक्तीची मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर करण्याचा मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. आता फेरनिरीक्षण करून मूळ मालकांच्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.”
महसूल कायद्यात मोठे बदल होणार
महसूलमंत्री बावनकुळे यांनी माहिती दिली की, केवळ कलम १५५ नव्हे तर कलम ७० (ब) आणि कलम ८५ यांचाही काही प्रकरणांत गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अधिकारांचा गैरवापर होऊ नये, यासाठी या तिन्ही कलमांतील काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी समिती काम करत असून, पुढील अधिवेशनात महसूल कायद्यात मोठी दुरुस्ती करणारे विधेयक आणले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ठळक मुद्दे
उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित
गंभीर प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
काही अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा
मागील ५ वर्षांतील कलम १५५ अंतर्गत सर्व आदेशांची राज्यभर चौकशी
महसूल कायद्यात मोठ्या दुरुस्तीची तयारी


Translate »
error: Content is protected !!