ग्रामीण भागातील ज्येष्ठांना मोठा दिलासा मोहरे येथे एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
पन्हाळा प्रतिनिधी श्री शंकर कुंभार – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) कोल्हापूर विभागाच्या वतीने प्रवाशांना सवलतीच्या योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी एन सी एम सी हे कार्ड आता विविध सवलतीच्या प्रवास योजनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. याअंतर्गत मोहरे ता. पन्हाळा येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात एन सी एम सी कार्ड नोंदणी व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महाराष्ट्र शासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. प्रवासात १०० टक्के तिकीट सवलत, तर ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के तिकीट सवलत देण्यात येते. तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के प्रवास सवलत मिळते. याशिवाय दिव्यांग, दृष्टिहीन, विद्यार्थी व शासनाच्या विविध प्रवासी सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी एन सी एम सी कार्ड आवश्यक करण्यात आले आहे.पूर्वी आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र किंवा इतर कागदपत्रांच्या आधारे सवलतीचा लाभ दिला जात होता. मात्र आता एस.टी.ने प्रवास करताना संबंधित सवलतींसाठी एन सी एम सी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी हे कार्ड काढून घेण्याचे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिकांना तालुका किंवा शहरात जाऊन कार्ड काढण्याची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक गावात जाऊन कंत्राटी पद्धतीने अल्प शुल्कात एन सी एम सी कार्ड नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, एस.टी. कोल्हापूर विभागाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.मोहरे येथे आयोजित शिबिरात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून एन सी एम सी कार्डची नोंदणी करून घेतली. गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.