ताज्या घडामोडी

पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील


पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

मायबाप सरकारने बळीराजाची तहान आणि जनावरांची भूक भागवावी

सांगोला ; तालुका प्रतिनिधी निम्म्यापेक्षा जास्त पावसाळा उलटला तरीही सांगोला तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील बळीराजा आणि जनावरांची तहान भागवण्यासाठी कृष्णा, कोयना, पंचगंगा, भीमा आणि नीरा नदीतील पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित टेंभू उपसा सिंचन योजना तसेच म्हैसाळ योजना व निरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्यातील माणगंगा व कोरडा या प्रमुख नद्यांसह स्थानिक ओढे, नाले आणि तलावात सोडावे अशी आग्रही मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली.
सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नावर सोमवार दि २७ रोजी माजी आमदार दिपकआबा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार बाळूताई भागवत यांना लेखी निवेदन दिले यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना दिपकआबा म्हणाले, पावसाळ्यातील दोन महिन्यात एकदाही पुरेसा पाऊस न झाल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील विहिरी, तलाव, ओढे, नाले, बंधारे आणि कुपनलिका असे जलस्रोतही भूजल पातळी खालावल्याने पूर्णपणे आटले आहेत. अशा परिस्थितीत सांगोला तालुक्यावर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. हे संकट दूर करण्यासाठी कृष्णा, कोयना, पंचगंगा आणि नीरा या नदीपत्रात अतिवृष्टीमुळे वाहून जाणारे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून मानगंगा नदीत सोडावे व या नदीवरील सर्व बंधारे तसेच टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात असणारे बुधेहाळ व अन्य तलाव स्थानिक ओढे नाले भरून द्यावेत. त्याचबरोबर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पारे, जवळा या गावातील तलावासह कोरडा नदीत हे पाणी सोडून नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे भरून द्यावेत त्याचबरोबर योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व छोटे-मोठे तलाव आणि ओढे नाले भरून देण्यात यावेत. तसेच निरा उजवा कालव्यातून पाणी सोडून फाटा क्र. ४ आणि ५ ला पाणी शेवटपर्यंत पूर्ण क्षमतेने सोडावे त्याचबरोबर तालुक्यातील चिंचोली तलाव तसेच सोनके तलाव, अन्य ओढे नाल्यांना पाणी सोडावे त्याचबरोबर राजेवाडी तलाव भरून देण्यात यावा त्यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावांना याचा लाभ होईल. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सांगोला तालुक्यावर ओढवलेले हे जलसंकट लवकरात लवकर दूर करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्न करावेत असेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.
चौकट ;
१) जनावरे भुकेली, बळीराजाही तहानलेला..!
शेती आणि पशुपालन हे सांगोला तालुक्यातील दोन प्रमुख व्यवसाय आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने आधीच खरीप हंगाम वाया गेला आहे परिणामी शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आला आहे. त्याचबरोबर तालुक्यात प्रचंड चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुपालन हा व्यवसायही प्रचंड संकटात सापडला आहे. जनावरांची भूक आणि बळीराजाची तहान भागवण्यासाठी सांगोला तालुक्याला तत्काळ पाणी सोडावे ;
मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील
२) या भागांना पाण्याची नितांत गरज
सांगोला तालुक्यासाठी वरदान असणाऱ्या टेंभू, म्हैसाळ व निरा उजवा कालवा या सिंचन योजनामधून तालुक्यातील माणगंगा, कोरडा, बेलवन, आफ्रुका या नद्यांसह स्थानिक ओढे, नाले त्याचबरोबर सांगोला शाखा कालवा फाटा ४ आणि ५ तसेच पारे, हंगीरगे, घेरडी, जवळा, चिंचोली, बुद्धेहाळ, तिसंगी आणि राजेवाडी यांसह छोटे-मोठे तलाव भरून दिल्यास सांगोला तालुक्यात असणारी भीषण पाणीटंचाई दूर होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजासह कृषीधन आणि पशुधन यांना जीवदान मिळण्यास मदत होणार असल्याचे दिपकआबांनी स्पष्ट केले

 


Translate »
error: Content is protected !!