सांगोला तालुका मुख्याध्यापक संघातर्फे नूतन व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
आमदार जयंत तासगावकर व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार संपन्न
प्रतिनिधी शशिकांत कोळी -सांगोला तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने नूतन नियुक्त तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास आमदार जयंत आसगांवकर व आमदार बाबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात नूतन नियुक्त मुख्याध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करत त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगांवकर म्हणाले की, शासनाने एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असला तरी दुसरीकडे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी चिंताजनक आहे. अनुदानित शाळा कशा टिकतील यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करावे. शिक्षण व्यवस्थेतील अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचे महान कार्य शिक्षक करीत आहेत. समाज घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून होत असून शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन पिढी घडविण्याची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत. शिक्षकांच्या कार्याचा समाजाला कायम अभिमान राहील, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष सुभाषराव माने, सांगोला पंचायत समितीच्या सभापती सुमन इंगळे, गटशिक्षणाधिकारी सुनील नवले, अशोक नवले, शरद कोलेकर, अण्णासाहेब गावडे, शिवेंद्र रेगे, रमेश आबनावे, रामचंद्र जानकर, अमोल गावकवाड, आनंदराव मासाळ, राजेंद्रकुमार वाघमोडे यांच्यासह सांगोला तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.