मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद ; ग्राहक आणि प्रशासनाच्या समन्वयाने भारनियमनावर निघणार तोडगा
दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद ; ग्राहक आणि प्रशासनाच्या समन्वयाने भारनियमनावर निघणार तोडगा
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला
सांगोला ; तालुका प्रतिनिधी / रवीराज शेटे
सांगोला शहर आणि तालुक्यात सकाळी ६ ते १० आणि रात्री ६ ते १० या वेळेत विजेचे भारनियमन होणार नाही तसेच शेतीपंपासाठी पूर्ण क्षमतेने ८ तास वीजपुरवठा केला जाईल असे आश्वासन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता साळवे यांनी दिले. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आणि सांगोला शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांसोबत शुक्रवार दि १९ जून रोजी सांगोला येथील महावितरणच्या कार्यालयात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
सांगोला शहर आणि तालुक्यातील वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी आणि पशुपालक चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर सोमवार दि १५ जून रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी थेट महावितरणच्या कार्यालयात धडक दिली होती. शेतकरी आणि पशुपालकांसाठी जाचक असणारे बाहेर नियमन त्वरित रद्द करा अन्यथा थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला होता यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मधुकर साळवे आणि कार्यकारी अभियंता शिंदे यांनी सांगोला येथे येऊन सदरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवार दि १९ रोजी ते सांगोला येथील महावितरणच्या कार्यालयात आले होते, यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी वीज वितरण कंपनी आणि वीज वितरण कंपनीचे ग्राहक यांनी परस्परात समन्वय आणि संवाद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच शेतकरी आणि पशुपालकांनीही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करून त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली. सकाळी सहा ते दहा आणि रात्री सहा ते दहा या वेळेत जास्त वीज लागणारी उपकरणे चालवू नयेत यामुळे प्रशासनावर अतिरिक्त भार पडतो आणि त्यातून नाईलाजाने प्रशासनाला भारनियमन करावे लागते यासाठी वीज वितरण कंपनीचे ग्राहक असणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांनी आपली कर्तव्ये लक्षात ठेवून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करावी असे आवाहन शेतकरी आणि पशुपालक बांधवांना केले. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजी पाटील, शिवाजी बनकर, विजय येलपले, विजय पवार, चंद्रकांत चौगुले, चंद्रकांत कारंडे, सोमनाथ लोखंडे, सूर्याजी खटकाळे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
चौकट ;
१) माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळसोबत आमची सविस्तर चर्चा झाली या चर्चेतून सामान्य शेतकरी आणि पशुपालक यांच्या समस्या समजल्या शेतकरी बांधवांनीही प्रशासनाला सहकार्य करावे सकाळी सहा ते दहा आणि रात्री सहा ते दहा या वेळेत वीज वितरण कंपनीवर किंवा यंत्रणेवर जास्तीचा भार येणार नाही अशी उपकरणे ग्राहकांनी चालवावी शेतकरी ग्राहकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आम्ही निश्चित तुमच्या सेवेसाठी तत्पर राहू,
मा.मधुकर साळवे,
कार्यकारी अभियंता,
महावितरण पंढरपूर विभाग.
२) अजनाळे येथील दलीतवस्ती अंधारात ; दिपकआबांनी प्रशासनाला धारेवर धरले
अजनाळे ता. सांगोला येथील भंडगेवस्ती येथे गेल्या अनेक दिवसांपासून वीज नसल्याने सदरची दलितवस्ती अंधारात आहे याबाबत जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले यांनी प्रश्न उपस्थित केला असता माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी या प्रश्नावर सबंधित प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर भंडगेवस्ती येथील नागरिकांना वीज देण्याचे आश्वासन दिले.





