ब्रेकिंग न्यूज

गरीबांच्या खिशावर ‘झिरो कर्मचाऱ्यांचा’ डल्ला; मंगळवेढा तहसीलमधील लूट थांबवण्यासाठी युवासेना मैदानात


गरीबांच्या खिशावर ‘झिरो कर्मचाऱ्यांचा’ डल्ला; मंगळवेढा तहसीलमधील लूट थांबवण्यासाठी युवासेना मैदानात

मंगळवेढा, 10 जून 2026 (प्रतिनिधी शशीकांत कोळी): “दाखला काढायला गेलो की 200 रुपये सरकारी फी बरोबर 100-200 रुपये ‘झिरो कर्मचाऱ्यांना’ द्यावे लागतात. नाही दिले तर फाईल पुढेच सरकत नाही.” ही व्यथा आहे मंगळवेढा तहसीलमध्ये येणाऱ्या सामान्य, गरीब शेतकऱ्यांची. पुरवठा व महसूल शाखेतील या ‘लूट राज’विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना आता मैदानात उतरली आहे. शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांनी 29 जून 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
झिरो कर्मचारी’ म्हणजे काय? गरीबांची लूट कशी?
पुरवठा शाखेत अधिकृत सरकारी कर्मचाऱ्यांऐवजी अवैध ‘झिरो कर्मचारी’ म्हणजेच खाजगी ऑपरेटर बसवले आहेत. हे ऑपरेटर रेशन कार्ड, धान्य वाटप व इतर कामांसाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेकडून बेकायदेशीर पैशांची वसुली करतात. एका साध्या कामासाठी 100 ते 500 रुपयांपर्यंत उकळले जातात. हा सर्व प्रकार पुरवठा अधिकारी कुलकर्णी यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. “सरकारी ऑफिसमध्ये खाजगी माणसे बसून गरीबांच्या घामाचा पैसा लुटतात. ही खंडणीच आहे,” असे नाईकवाडी म्हणाले.
RTI च्या नावाने वरिष्ठांची फसवणूक
महसूल सहायक शिवाजी भोसले यांच्यावरील आरोप अधिक गंभीर आहे. जन्म-मृत्यू नकलेतील गैरप्रकाराची चौकशी सुरू असताना, स्वतःचे निलंबन टाळण्यासाठी भोसले यांनी “माहिती अधिकाराखाली कागदपत्रे जोडली” असे खोटे सांगून वरिष्ठांची दिशाभूल केली. 6 मे 2026 च्या चौकशी अहवालात भोसले दोषी ठरूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. “विषय नकलेचा, पण कारण RTI चं. हा निव्वळ खोटारडेपणा आहे,” असा आरोप युवासेनेने केला.
युवासेनेचा इशारा: मागण्या मान्य करा, नाहीतर…
1. सर्व ‘झिरो कर्मचाऱ्यांवर’ तात्काळ FIR दाखल करा.
2. पुरवठा अधिकारी कुलकर्णी यांच्यावर कडक कारवाई करा.
3. दोषीना निलंबित करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.
4. जनतेचे प्रलंबित दाखले तातडीने द्या.
“प्रशासनाने 100 मीटरवर आंदोलन करा म्हटलंय. आम्ही नियम पाळू. पण गरीबांची लूट थांबेपर्यंत, दोषींवर कारवाई होईपर्यंत आम्ही हटणार नाही. परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा अरविंद नाईकवाडी यांनी दिला.

Translate »
error: Content is protected !!