ब्रेकिंग न्यूज

सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात वीज टंचाईमुळे नागरिक त्रस्त


सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात वीज टंचाईमुळे नागरिक त्रस्त


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी आण्णासाहेब खरात.
सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या वीजपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये संध्याकाळी उशिरा थ्री फेज वीजपुरवठा सुरू होत असून सकाळपर्यंतच वीज उपलब्ध राहत आहे. दुपारच्या वेळेतही मर्यादित तासांसाठीच वीज दिली जात असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.यापूर्वी संध्याकाळच्या वेळेत काही तास नियमित वीजपुरवठा होत होता. मात्र आता वेळेत बदल करण्यात आल्याने सायंकाळीनंतर अनेक गावांमध्ये अंधाराचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सध्या भीषण उन्हाळा सुरू असून उष्णतेचा प्रचंड तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच छोटे व्यावसायिक यांचे हाल होत आहेत. अनेक घरांमध्ये नवजात व लहान बालके असून उकाडा आणि अंधारामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता पालकांकडून व्यक्त केली जात आहे.वीज नसल्यामुळे पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांचा अभ्यास, शेतीची कामे तसेच लहान उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत. वारंवार बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी संबंधित वीज विभागाने तात्काळ लक्ष देऊन नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.एकीमध्येच ताकद असते या भावनेतून ग्रामीण भागातील नागरिकांनी संघटित होऊन योग्य वीजपुरवठ्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Translate »
error: Content is protected !!