श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधीक्षक पद तात्काळ भरण्याची मागणी; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन
श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधीक्षक पद तात्काळ भरण्याची मागणी; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन
पन्हाळा प्रतिनिधी श्री शंकर कुंभार – श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर, ता. पन्हाळा येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधीक्षक पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असल्याने परिसरातील ग्रामस्थांसह देवदर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना आरोग्यविषयक गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दख्खनचा राजा जोतिबा वाडी रत्नागिरी नावानेही ओळखले जाते. येथे महाराष्ट्रासह परराज्यातून दररोज मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा विस्कळीत झाली असून, अचानक उद्भवणाऱ्या आजारपण, अपघात तसेच प्राथमिक उपचारासाठी नागरिकांना व भाविकांना मोठी गैरसोय होत आहे.
विशेषतः यात्रेच्या व सण-उत्सवाच्या काळात आरोग्य सेवा सक्षम असणे अत्यावश्यक असतानाही सद्यस्थितीत पुरेशी वैद्यकीय सोय उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर श्री ज्योतिबा पुजारी उत्कर्ष समिती यांच्या वतीने तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधीक्षक पद भरण्यात यावे, अशी ठाम मागणी करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेन साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर वैद्यकीय अधीक्षक पद लवकरात लवकर भरण्याचे आश्वासन दिले आहे.हे निवेदन श्री ज्योतिबा पुजारी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ लादे, तसेच संदीप दादर्णे, दत्तात्रेय धडेल, उदय झुगर , दत्ता मिटके आदी समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने सादर करण्यात आले.
भाविक भक्तांची सुरक्षितता व ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पद तात्काळ भरले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी होईल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




