ब्रेकिंग न्यूज

वारणा सहकाराचा गौरव! डॉ. विनयरावजी कोरे सावकार यांना ‘सहकार भूषण पुरस्कार – २०२६’ प्रदान


वारणा सहकाराचा गौरव! डॉ. विनयरावजी कोरे सावकार यांना ‘सहकार भूषण पुरस्कार – २०२६’ प्रदान

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री शंकर कुंभार –आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व ‘सहकारी महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात वारणा समूहाचे अध्यक्ष तसेच पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय डॉ. विनयरावजी कोरे (सावकार) यांना प्रतिष्ठेचा ‘सहकार भूषण पुरस्कार – २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते डॉ. विनयरावजी कोरे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार, शिक्षण, दुग्ध व्यवसाय, ग्रामीण विकास आणि शेतकरी कल्याण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व दीर्घकालीन कार्याची दखल घेत हा सर्वोच्च सन्मान त्यांना बहाल करण्यात आला.पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. विनयरावजी कोरे म्हणाले, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून वारणेत कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, कर्मचारी, सभासद, शेतकरी व हितचिंतकांचा आहे. कोणतेही सहकार क्षेत्रातील यश हे एका व्यक्तीचे नसते. लाखो लोकांच्या विश्वास, श्रम आणि समर्पणातून वारणा समूहाची ही यशोगाथा उभी राहिली आहे. त्यामुळे हा ‘सहकार भूषण’ पुरस्कार मी वारणेच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे.” त्यांच्या या भावनिक व कृतज्ञतेच्या भावना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले डॉ. विनयरावजी कोरे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली वारणा समूहाने सहकार, दुग्ध व्यवसाय, शिक्षण, उद्योग, शेती आणि ग्रामीण विकास या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. ग्रामीण भागातील हजारो शेतकरी, दूध उत्पादक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळेच वारणा समूह आज राज्यातील आदर्श सहकारी संस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो.’शिक्षणाचा महामेरू’ आणि ‘दूध पंढरी’ म्हणून महाराष्ट्रात लौकिक मिळविलेल्या वारणा नगरीसाठी हा पुरस्कार अभिमानाचा क्षण ठरला आहे. डॉ. विनयरावजी कोरे यांना मिळालेल्या या सर्वोच्च सहकारी सन्मानामुळे संपूर्ण वारणा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते, सभासद, शेतकरी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Translate »
error: Content is protected !!