कोल्हापूर–सिंधुदुर्गात ५२०० कोटींचे जलविद्युत प्रकल्प; ११०० रोजगारांची निर्मिती
कोल्हापूर–सिंधुदुर्गात ५२०० कोटींचे जलविद्युत प्रकल्प; ११०० रोजगारांची निर्मिती
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री शंकर कुंभार -वारणा नवशक्ती निर्माण संस्थेसोबत जलसंपदा विभागाचा सामंजस्य करार; राज्याच्या ऊर्जा क्षमतेला मोठी चालना
कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित तीन उद्दंचन (पंप्ड स्टोरेज) जलविद्युत प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था यांच्यात सुमारे ५२०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे राज्याच्या ऊर्जा निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून सुमारे ११०० रोजगारांची निर्मिती होणार आहे.मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. विनय रावजी कोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे तसेच नवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष एन. एच. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या कराराअंतर्गत कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन “ कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप” उद्दंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असून शाहूवाडी तालुक्यात “कडवीऑफ स्ट्रीम” स्वरूपातील आणखी एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या तीनही प्रकल्पांमधून एकूण सुमारे ११०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता उभी राहणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराला राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा संबोधत, “वारणा समूहाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ऊर्जा क्षेत्रातही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. या प्रकल्पांना ‘अँकर प्रोजेक्ट’ म्हणून शासनाचे सहकार्य राहील,” असे सांगितले. तसेच वीज खरेदी करार व वित्तीय सहाय्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्दंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले. प्रदूषणमुक्त व शाश्वत वीज निर्मितीमुळे २४ तास वीजपुरवठा सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पन्हाळा शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. विनय रावजी कोरे यांनी सहकार क्षेत्रातून उभा राहणारा हा पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगत, “या प्रकल्पामुळे केवळ वीज निर्मितीच नव्हे तर दुष्काळग्रस्त भागांनाही अप्रत्यक्ष लाभ होईल. पावसाळ्यात समुद्रात जाणारे पाणी वळवून त्याचा उपयोग करता येईल,” असा विश्वास व्यक्त केला.या प्रकल्पांमुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून औद्योगिक व आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. सहकार क्षेत्रात ऊर्जा निर्मितीच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारा हा प्रकल्प ठरणार असल्याचे मानले जात आहे.




